23.3 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरसच्चे, विकासभीमुख खासदार हरवले

सच्चे, विकासभीमुख खासदार हरवले

लातूर : प्रतिनिधी
नांदेडचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण  यांच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले असून वसंतराव चव्हाण हे दोन वेळा माझ्यासोबत विधान परिषदेचे आमदार म्हणून अतिशय चांगल कार्य केले. २० वर्ष नायगावचे सरपंच, जिल्हा परीषद सदस्य म्हणून काम करत असताना लोकांचें प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्य करायचे. काही दिवसापूर्वी नुकतेच ते नांदेड येथून लोकसभेवर काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसचे नुकसान झाले आहे. त्यांच्या माध्यमातून नांदेड व परिसरातील विकासकामाला सूरवात करण्या अगोदरच नियतीने त्यांना आपल्यातून घेवून गेले,  अशा शब्दात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला.
सकाळी जेव्हा हि दु:खद बातमी कळाली विश्वास बसेना.दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण हे यापूर्वी दोन वेळा आमदार असताना सभागृहात ज्वलंत समस्या मांडायचे विकासाची कामे करण्यासाठी पाठपुरावा करुन लोकांशी संवाद ठेवायचे. एखादा विषय मार्गी लावण्यासाठी ते पाठपुरावा करायचे एक स्वच्छ विकास भुमीख अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन  निघणार नाही त्यांच्या दु:खात देशमुख  परिवार सहभागी आहे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी स्व. वसंतराव चव्हाण यांच्याविषयी भावना व्यक्त केली.
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व हरपले 
काँग्रेस नेते, नांदेडचे नवनिर्वाचित, लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक  आणि दु:खद आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या जाण्याने, समाजकारण, राजकारण शैक्षणिक, कृषी या क्षेत्राबरोबरच  काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हणले आहे.
स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन चव्हाण  कुटुंबीयांच्या दु:खात मी व संपूर्ण देशमुख कुटुंबीय सहभागी आहोत, असेही आमदार देशमुख यांनी म्हणले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले खासदार वसंतराव चव्हाण यांची कार्यपद्धती आणि लोकप्रियता लक्षात घेता त्यांच्या  माध्यमातून नांदेडसह राज्य आणि देशाच्या विकासात भर पडेल हा विश्वास होता, मात्र नियतीने त्यांना अचानक आपल्यातून   नेले आहे.  त्यामुळे  न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.  माजी मुख्यमंत्री विलासराव् देशमुख यांच्यासोबतच देशमुख कुटुंबीयांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते, संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांना आणि त्यांच्या सहका-यांना या दु:खातून सावरण्याची शक्ती प्रदान करावी, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करीत असल्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हणले आहे.
जनतेशी एकरुप झालेले, कर्तव्यनिष्ठ नेतृत्व आपण गमावले
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या जाण्याने जनतेशी एकरुप झालेले, कर्तव्यनिष्ठ आणि अनुभवी नेतृत्व आपण गमावले आहे. वसंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत सदस्य पदापासून सुरु झाली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य, अशी त्यांची प्रदिर्घ कारकीर्द राहिली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत तत्पर असत. कठीण काळात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचा विचार घरोघरी नेला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते. अचानक ते आपल्यातून गेल्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चव्हाण परिवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो व वसंतराव चव्हाण यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR