बस्तर : महतारी वंदन योजना ही छत्तीसगडसरकारची एक गेमचेन्जर योजना मानली जाते. मात्र, यात मोठी गडबड होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचेही नाव समाविष्ट झाले आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गेल्या १० महिन्यांपासून सनी लिओन नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दरमहिन्याला १००० रुपये जात आहेत.
हे प्रकरण राज्यातील बस्तर भागातील आहे. येथे महतारी वंदन योजनेचा लाभ सनी लियोन घेत आहे. (बॉलीवुडमध्ये सनी लिओनी नावाची एक चर्चित अभिनेत्रीही आहे.) सरकारच्या महतारी वंदन योजनेच्या वेबसाइटवर याच नावाने लाभार्थाची नोंद आहे. वेबसाइटवर नोंदणी क्रमांक एमव्हीवाय ००६५३५५७५ प्रविष्ट केल्यावर, लाभार्थ्याचे नाव सनी लिओन असे दिसते, तर तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दिसते. योजना सुरू झाल्यापासून, लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा १,००० रुपये जमा झाले आहेत.
खोटी नावे समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेसाध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, छत्तीसगड सरकार महतारी वंदन योजनेत माता-भगिनींच्या नावाने मोठा गोलमाल करत आहे, हे आम्हाला आधीपासूनच वाटत होते. कोन आहे ही सनी लिओन जिच्या कात्यावर पैसे जात आहेत? कोण आहे याचा सूत्रधार या चौकशीचा विषय आहे. तसेच, करीना कपूरच्या नावाने देखील पैसातर जात नाहीय, याचाही तपास सरकारने करायला हवा. महतारी वंदनच्या नावाने मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत.
भाजपचा पलटवार
दीपक बैज यांच्या विधानावर भाजपनेही पलटवार केला आहे. भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल.
प्रशासनाची कारवाई
ही बाब लक्षात येताच प्रशासनाने वेबसाइटवरून ही नोंद हटवली आहे. संबंधित लाभार्थ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण बस्तर ब्लॉकच्या तालूर पंचायतीशी संबंधित आहे. यासंदर्भात बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस म्हणाले, माहिती मिळताच संबंधित बँक खाते होल्ड करण्यात आले आहे. योजनेंतर्गत गेलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच, फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.