मुंबई : प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार महाराष्ट्राचा कल महायुतीकडे आहे.
यासंदर्भात झीची एआय अँकर जीनिया हिचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस सर्व्हेमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. दुस-या क्रमांकावर एकनाथ शिंदे, तर तिस-या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता मिळवू शकतो का?असे विचारले असता ३८ टक्के लोकांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिली आहे तर २२ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठबळ दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला १७ टक्के लोकांनी पसंती दिली. केवळ १४ टक्के लोकांनी काँग्रेस पक्षाला पसंती दिली. याशिवाय केवळ ९ टक्के लोक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहेत. शिवसेना फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंना मतदारांची सहानुभूती मिळेल का? असे विचारले असता ३५ टक्के लोक त्यांच्या बाजूने उभारले आहेत. मात्र ४५ टक्के लोकांनी त्यांना कोणतीही सहानुभूती नाही, असे म्हटले तर २० टक्के लोकांनी मत व्यक्त करण्यास पसंती दिली.
महायुतीला दिलासा
मिळण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला सर्व्हेमध्ये दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना आणली. या योजनांचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला फायदा होईल का, असे विचारले असता, ५५ टक्के लोकांनी सरकारच्या बाजून मत व्यक्त केले.