17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूरसाथरोग प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू 

साथरोग प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू 

लातूर : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही कोरडा दिवस पाळणे व इतर उपायांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी जून-जुलै महिन्यात पाऊस कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते.परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. डास आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उद्भवतात. या जलजन्य आणि कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपले घर आणि परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे,कीटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे असते.डेंग्यू या आजाराचे प्रसार करणारे डास हे घरातील मनिप्लांट, फ्रिज, कुलर,जमिनीतील पाण्याची टाकी, प्लास्टिकच्या टाक्या, घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर,प्लास्टिक कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तूमध्ये साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालत असतात. याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या जोडीला लोकसहभाग महत्त्वाचा असतो.
आगामी पावसळ्यात साथरोग उद्भवू नयेत यासाठी नागरिकांनी डासांपासून संरक्षणासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घर, घराच्या परिसरात नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचू देऊ नये.डासांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करावे. घर व परिसर स्वच्छ ठेवावा.ताप येताच वैद्यकीय अधिका-यांचा त्वरित सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करावेत. ताप अंगावर न काढता उपचार घ्यावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR