बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून माध्यमांना व्हीडीओ पाठविण्यात आला. त्यानंतर बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी या घटनेबाबत खुलासा केला आहे.
वाघ म्हणाले, टेक्सटाईल पार्कचे हे प्रवेशद्वार मुळातच फक्त मालवाहतुकीसाठी आहे. येथून येणा-या गाड्या मालवाहतुकीच्या असतात. पार्कमध्ये येणा-या नागरिकांसाठी दुसरे गेट उपलब्ध आहे.
त्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक परप्रांतीय आहे. तो प्रतिभा काकी यांना ओळखत नव्हता. मात्र याबाबत मला समजल्यानंतर त्यांना तेथून पार्कमध्ये सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर प्रतिभा काकी पार्कमध्ये आल्या. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधला. तसेच खासदार सुप्रिया ताई सुळे, युगेंद्र पवार देखील नुकतेच पार्कमध्ये येऊन गेले आहेत. यापूर्वी प्रतिभा काकी आणि रेवती ताई पार्कमध्ये येऊन गेल्या आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच केले आहे. आज त्या येण्याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. ती असती तर आम्ही स्वागताला थांबलो असतो. त्यांना काही तसदी झाली असल्यास आम्ही क्षमा मागतो,असे स्पष्टीकरण बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिले आहे.