18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयसुवर्णकन्या!

सुवर्णकन्या!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन आकडी पदक कमाई करण्याचे लक्ष्य ठेवून सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाला सहा पदकांवरच समाधान मानावे लागले! त्यातही सुवर्णपदकाने भारताला हुलकावणीच दिली. नीरज चोप्रा व विनेश फोगट या दोघांनी सुवर्णपदकाच्या आशा जागृत केल्या होत्या. मात्र, नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आणि विनेश फोगटला तर कुठल्याही पदकाविना मायदेशी परतावे लागले. त्यामुळे साहजिकच भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली होती. मात्र, त्याच पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत दुस-याच दिवशी एका सुवर्णपदकासह चार पदकांचा खणखणीत चौकार मारत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवत देशातील क्रीडाप्रेमींमध्ये पुन्हा जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

या चारही पदकविजेत्यांची कामगिरी लक्षणीय असली तरी इतिहास घडविला तो सुवर्णकन्या अवनी लखेराने! महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अवनीने सुवर्णपदक पटकावून सलग दुस-या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली! अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय पॅरा-खेळाडू ठरली आहे. त्याचवेळी याच स्पर्धेत याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्यपदकाची कमाई करून एकाच स्पर्धा प्रकारात देशाला दुहेरी पदक प्राप्त करून देण्याच्या विक्रमी कामगिरीची नोंद केली. तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अवनीने एक सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई करून देशाला दुहेरी अभिमान व आनंदाचा क्षण दिला होता. २२ वर्षीय अवनीने तेव्हा २४९.६ गुणांसह सुवर्णपदक पटकाविण्याच्या पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली होती.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने स्वत:चा विक्रम मागे टाकत नव्या विक्रमासह सलग दुस-या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी करत ती ‘वंडरगर्ल’, ‘सुवर्णकन्या’ असल्याचेच सिद्ध केले. तिने नवा विक्रम नोंदविताना २४९.७ गुणांचा वेध घेतला. अवनीचे हे यश वैशिष्ट्यपूर्ण ठरते कारण टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेनंतर अवनीला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले होते. आपल्या अपंगत्वाचे आव्हान पेलत असतानाच अवनीला अनेक आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागला. तिच्यावर पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याची व त्यातून संघर्षाने सावरण्याची वेळ आली. जवळपास दीड महिना अवनीला सक्तीच्या विश्रांतीला सामोरे जावे लागले. शस्त्रक्रियेमुळे तिचे वजन घटले, अशक्तपणा आला. मात्र, या सर्व आव्हानांचा सामना करून अवनी कर्णी सिंग रेंजवर सरावाला उतरली. गमावलेली ऊर्जा, ताकद, एकाग्रता व मानसिक निग्रह परत मिळवण्यासाठी तिने कठोर संघर्ष केला. या अथक परिश्रम व हार न मानण्याच्या वृत्तीचे फळ तिला पॅरिसमध्ये मिळाले.

तिच्यामुळे पॅरिसमध्ये भारताचे राष्ट्रगीत गायले गेले व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. सुवर्ण पदकाच्या शर्यतीत तिला दक्षिण कोरियाच्या ली युनरीचा कडवा प्रतिकार सोसावा लागला. शेवटच्या फेरीपर्यंत दोघींमध्ये केवळ काही दशांश गुणांचे अंतर होते. अखेरच्या प्रयत्नात मात्र अवनीने १०.५ गुणांची कमाई करून सुवर्णपदकाचा वेध घेतला. अवनीचा हा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. वयाच्या ११ व्या वर्षी एका अपघातात अवनीच्या कंबरेखालील भागास मोठी दुखापत झाली. अर्धांगवायूचा झटका आल्याने तिचे उर्वरित आयुष्य व्हीलचेअरवरच राहणार हे स्पष्ट होते. मात्र, अवनीने हार व मानता जिद्दीने या आव्हानांचा सामना केला. २०१४ मध्ये तिच्या वडिलांनी तिला पहिल्यांदा शूटिंग रेंजवर नेले. नेमबाजी खेळाशी तोंडओळख झाल्यावर २०१८ पासून अवनीने मुंबईत सुमा शिरूर यांच्या ‘लक्ष्य शूटिंग क्लब’मध्ये स्पर्धेसाठीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू केले. क्रीडा प्राधिकरणाने अवनीची नेमबाजीतील झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून तिच्या घरी खास डिजिटल टार्गेटची निर्मिती करून दिली.

आपल्या कठोर परिश्रमाने अवनीने पहिल्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले व याच कामगिरीत सातत्य राखत पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. आणि दुस-या प्रकारात रौप्यपदक पटकावून डबल धमाका केला. त्यामुळे साहजिकच यावेळी अवनीकडून अशाच शानदार कामगिरीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. अवनीने सुवर्णपदक पटकावून व ऐतिहासिक कामगिरी नोंदवून भारतीय क्रीडाप्रेमींच्या अपेक्षांची पूर्तता केली आहे. आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करतानाच अजून मोहीम संपलेली नाही. त्यातही यश मिळवायचे आहे, असे अवनी निग्रहाने सांगते. अवनीच्या या शानदार कामगिरीचे व निग्रहाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. तिने भारतीयांना अभिमानाची व आनंदाची अनुभूती दिली आहे. तिच्याबरोबरच मोना अगरवालनेही पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करून भारतीयांना दुहेरी आनंद मिळवून दिला. तर पॅरा-अ‍ॅथलिटमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्र्धेत भारताच्या प्रीती पालने कांस्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात पदक प्राप्त करणारी प्रीती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

प्रीतीने १०० मीटरचे अंतर १४.२१ सेकंदात पूर्ण केले. पदक मिळवल्यावरही तिचा स्वत:च्या या कामगिरीवर विश्वास बसत नव्हता. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करणा-या मनीषा नरवालला यावेळी पॅरिसमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. एकंदर एकाच दिवशी पदकांचा खणखणीत चौकार मारून भारतीय खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा झोकात फडकावला आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीवरचे मळभ तर दूर झालेच आहे पण भारताचे दिव्यांग खेळाडू पदकांची दोन आकडी संख्या नक्की गाठतील ही अपेक्षाही उंचावली आहे, हे निश्चित! भारतीय पथकाच्या या स्पर्धेतील पुढील मोहिमेस हार्दिक शुभेच्छा! जय हो!!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR