लातूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाने इयत्ता दहावीच्या खालील म्हणजेच १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना ‘कोचिंग सेंटर’मध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय खरे तर अनाकलनीय आहे. एकीकडे शिक्षक भरती केली जात नाही तर दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगार तरुण ‘कोचिंग सेंटर’ चालवून आपल्या बेरोजगारीवर मात करीत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देत आहेत; परंतु शासन असा निर्णय घेऊन सुशिक्षितांनी उभा केलेला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा डोलारा जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे पुन्हा बेरोजगारीची कु-हाड या तरुणांवर कोसळणार असून विद्यार्थ्यांना मिळणा-या गुणवत्तापूर्ण शिक्षणालाही खंड पडणार आहे. म्हणून शासनाने या निर्णयाचा फेर विचार करावा, असे शालेय स्तरावर ‘कोचिंग सेंटर’ चालविणा-यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थी आत्महत्या, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खाजगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिकवण्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे; परंतु ही नियमावली गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणात खोडा घालणारी आहे तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार हिरावणारी ठरणार आहे, असे ‘कोचिंग सेंटर’ चालविणा-यांचे म्हणणे आहे. शाळेत शिक्षण दिले जाते; परंतु शाळेतील शिक्षण आणि ‘कोचिंग सेंटर’मधील शिक्षण यात पालकांना तफावत जाणवते. आपला पाल्य शाळेतील शिक्षणावर स्पर्धेत टिकणार नाही, असे पालकांना वाटते म्हणूनच पालक आपल्या पाल्यांना ‘कोचिंग क्लास’ लावतात. आम्ही केवळ क्रमिक पुस्तकांवर अवलंबून राहात नाही. विद्यार्थ्यांना समजेल अशा नोटस् स्वत: काढतो. सराव परीक्षा वारंवार घेतो. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देतो जे शाळेत दिले जात नाही. विद्यार्थ्यांचे डाऊटस् क्लिअर करतो. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो, असे एका ‘कोचिंग सेंटर’ चालकाचे म्हणणे आहे.
‘कोचिंग सेंटर’मध्ये विषयाचे ज्ञान व शिकविण्याची तळमळ असलेले शिक्षक असतात. त्याचे स्वत:चे गुण हे डिस्टिंक्शन किंवा त्याहून जास्त असल्याने ते जास्तीत जास्त चांगले शिकवून विद्यार्थ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. क्लासमध्ये विषयावरील तीन-चार पुस्तके वाचून त्यांच्यातील चांगले मुद्दे घेऊन प्रश्नोत्तर फॉर्ममध्ये नोट्स, लक्षात ठेवायचे मुद्दे हे पुरवतो. वर्गामध्ये तितका भाग लिहून देण्याचा वेळ वाचतो. परीक्षेत नेमके कसे प्रश्न विचारतात? सामान्यत: कोणते प्रश्न विचारतात? अपेक्षित प्रश्नांचा अंदाज याच्या अनुषंगाने विषय शिकवतो त्यामुळे कमीत कमी वेळात नेमका अभ्यास होतो. कोणीही पालक किंवा विद्यार्थी या समांतर व्यवस्थेवर टीका करीत नाहीत. उलट या व्यवस्थेचा फायदाच उठवतात, असे एका ‘कोचिंग सेंटर’चालकाने सांगितले.
पायाच मजबूत नसेल तर…
मी स्वत: एका शाळेत ३ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होतो. कायम नव्हतो एवढेच. कोणाचा अवमान करण्याच्या उद्देशाने मी हे सांगत नाही; परंतु आपण कायम होऊन या आशेने मी त्या ३ वर्षांत खूप पोटतिडकीने विद्यार्थ्यांना शिकवले. ती पोटतिडीक कायम असलेल्या शिक्षकांमध्ये दिसली नाही. शेवटी व्हायचे तेच झाले मी कायम झालो नाही. नाईलाज म्हणून नोकरी सोडली आणि ‘कोचिंग सेंटर’ सुरू केले. शाळेत आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा पाया मजबूत होणार नाही, याची खात्री पालकांना असल्यामुळेच पालक ‘कोचिंग सेंटर’मध्ये आपल्या पाल्यांना पाठवतात. पायाच मजबूत नसेल तर शालेय शिक्षणरुपी इमारत कशी उभी राहील? असे पालकांनाच वाटत असल्यामुळे ते आमच्या ‘कोचिंग सेंटर’ला पसंती देतात, असा अनुभव एका ‘कोचिंग सेंटर’चालकाने व्यक्त केला.