लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. लातूरकर नेहमीच विकास, विकासाचा दृष्टिकोन, विकासरत्न विलासराव देशमुख यांचा विचार आणि पक्षनिष्ठा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात; पण पक्षनिष्ठा सोडून गद्दारी करणा-यांना सुसंस्कृत लातूरकर कधीही पाठीशी घालत नाहीत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख चौथ्यांदा निवडणूक मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्याच घरातून पक्षाशी गद्दारी झाल्याने डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना धडा शिकविणार असल्याचे मतदार बोलून दाखवित आहेत.
त्यांच्या विरोधात लातूरमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख काँग्रेस पक्षाचे मराठवाड्याचे नेते आहेत. त्यांनी कायम काँग्रेसची निष्ठा जपली. देशात आणि राज्यात अनेक स्थित्यंतरे झाली; परंतु त्यांनी कधीच पक्षनिष्ठा सोडली नाही. त्यातच विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा पुढे चालविण्याचे काम ते भक्कमपणे करीत आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षात त्यांचे वजन वाढले असून उद्याचे राजकीय भवितव्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असताना स्थानिक पातळीवर जातीय समीकरणे जुळवून पुन्हा एकदा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे घर फोडून त्यांच्या विरोधात डाव रचल्याचे चित्र पहायला मिळत आहे; परंतु पक्षनिष्ठेशी गद्दारी करून वेगळी विचारधारा स्वीकारणा-यांना लातूरची जनता कधीच थारा देत नाही. यामुळे लातूरकर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे मतदारांमधून बोलले जात आहे.
माजी मंत्री अमित देशमुख यांनी लातूर शहरचे आतापर्यंत ३ वेळा प्रतिनिधित्व केले आहे मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसच्याच लोकांना फोडून त्यांच्या विरोधात लढत देण्याची खेळी भाजपने केली आहे. अर्थात, आजपर्यंत भाजपला स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवार उभा करता आला नाही. लातूरमध्ये भाजपची भिस्त आयात उमेदवारावरच आहे. या अगोदर काँग्रेस पक्षामधूनच भाजपमध्ये गेलेले शैलेश लाहोटी यांना माजी मंत्री अमित देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी दिली. त्या वेळी अनेकदा मोठे आव्हान उभे राहिल्याचे वातावरण तयार केले गेले; परंतु विकासरत्न विलासराव देशमुख यांचा विचार आणि विकासाचा वारसा लक्षात घेऊन लातूरकरच माजी मंत्री अमित देशमुख यांच्या मागेच खंबीरपणे उभे राहिले.
यामुळे प्रत्येक वेळा ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. लातूरमध्ये विकासरत्न विलासराव देशमुख यांचे विचार घट्ट रुजलेले आहेत. याला छेद देण्याचा भाजप सातत्याने प्रयत्न करीत आला आहे. त्यासाठी प्रत्येक निवडणुकीला वेगळे प्रयोग करून जातीय समीकरणे जुळविली जातात आणि मतविभाजनाचा डाव टाकून मताधिक्य कमी करतानाच वेगळा प्रयोग करून आपल्या उमेदवाराची सरशी कशी होईल, यासाठी व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न होतो. या वेळीदेखील डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा हाच डाव आहे; परंतु लातूरकर जातीयवादी भाजपचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देत नाहीत, अशी लातूरकरांमध्ये चर्चा सुरू आहे.