१० लाखांची मदत नको, माझा मुलगा हवा, आईची मागणी
परभणी : प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, हे आरोप सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने फेटाळून लावले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली १० लाखांची मदतही त्यांनी नाकारली.
या घटनेत पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यांच्याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशी हे कायद्याचे शिक्षण घेत होते. त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता, असे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्यावर सोमनाथच्या आईने संताप व्यक्त केला असून, माझ्या मुलाचा मृत्यू श्वासोच्छवासाच्या आजारामुळे नाही तर पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे. त्यामुळे माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे, असे म्हटले.
मुख्यमंत्र्यांचे बोलणे मला मान्य नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे मला मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. यावर मला न्याय पाहिजे. मंत्र्यांच्या आश्वासनांवर माझा विश्वास नाही. मला १० लाख रुपये नको. ते मंत्र्यांच्या खिशात ठेवा. नाही तर कोणत्या तरी पोलिसाला खाऊ घाला. मला माझा मुलगा पाहिजे, अशी मागणी आई वत्सला सूर्यवंशी यांनी केली. माझ्या मुलाला कसलाच आजार नव्हता. मला न्याय मिळाला पाहिजे. नाही तर मी इथेच जीव देईन, असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला.