लातूर : प्रतिनिधी
सरकारने खाजगी शिकवणीबाबत नुकताच एक निर्णय घेतला. यामुळे खाजगी शिकवणीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणी लावतात. पाल्य शिकतो, पुढे तो डॉक्टर, इंजिनिअर होतो किंवा चांगल्या पदावर जातो. खाजगी शिकवणीचा इतका मर्यादित विषय नाही तर त्यात असंख्य कंगोरे आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे, नामवंत शाळा, महाविद्यालयांत प्रवेशित विद्यार्थी खाजगी शिकवणी का लावतात? नामवंत शाळा, महाविद्यालयांत गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळत नाही का? की गुणवत्तापूर्ण शिक्षक न देताच या संस्था नामवंत झाल्या? याबाबत विद्यार्थ्यांचे मात्र वेगळे मत आहे. स्पर्धात्मक युगातल्या विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यात शाळा, महाविद्यालयांना आलेले अपयश याला कारणीभूत आहे. शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षणाचा व शिक्षकांचा दर्जा कसा वाढविता येईल? यावर समग्र चर्चा होणे अपेक्षित आहे.
शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण देशात सुप्रसिद्ध आहे. येथील नामवंत शाळा, महाविद्यालयांसोबतच नामवंत खाजगी शिकवणीमध्येही देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. खाजगी शिकवणी जितकी सुप्रसिद्ध त्या पटीत त्या शिकवणीची फिस! प्रवेश घेतला, फिस भरली, शिकवणी सुरू झाली की, शाळा, महाविद्यालय व शिकवणीचा २४ बाय ७ शेड्युल्ड ठरतो. दिवस-रात्र शिक्षणात स्वत:ला गुंतवून घेतले जाते. शाळा, महाविद्यालयांत गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळत नाही काय?, खाजगी शिकवणी का लावली? याबाबत कोल्हापूरच्या नामवंत महाविद्यालयात इयत्ता ११ वीत प्रवेश असलेल्या विद्यार्थ्याने सांगितले, महाविद्यालय नामवंत आहे; परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कसलीही हमी नाही. खूप अभ्यास केला; परंतु हवे ते मिळत नव्हते त्यामुळे त्या नामवंत महाविद्यालयात नॉमिनल अॅडमिशन कायम ठेवले आणि लातूरला आलो. खाजगी शिकवणीत प्रवेश घेतला. यामुळे एक झाले की, शिक्षणासाठी आपले आई-वडील पैसे मोजत आहेत. आपल्याला कष्टच करावे लागणार, ही मानसिकता झाली आणि अभ्यासाला सुरुवात केली.
रिपीटर बॅचचा एक विद्यार्थी म्हणाला, येथे रूम करून राहातो. खाजगी शिकवणी लावलेली आहे. अभ्यासिकाही आहे. सर्वच शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा खालवलेला नाही; परंतु सर्वच शाळा, महाविद्यालयांतून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते असेही नाही. तसे झाले असते तर माझे एक वर्ष वाया गेले नसते. आज मी रिपीटर बॅचचा विद्यार्थी आहे, याचे मला वाईट वाटते; पण ज्या संस्थेत मी होतो त्या संस्थेला माझ्याबद्दल वाईट वाटणार आहे काय? ‘नीट’ची तयारी करणा-या एका विद्यार्थिनीने सांगितले, ‘पेईंग एज्युकेशन’मुळे स्वत:ची जबाबदारी वाढली. एखादा विषय समजला नाही तर तो खाजगी शिकवणीमध्ये पुन्हा पुन्हा शिकवला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.