मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळ असलेले हनुमान मंदिर हटवण्याचा निर्णय रेल्वेने मागे घेतला आहे. रेल्वेने मंदिर प्रशासनाला नोटीस बजावून मंदिर अतिक्रमण घोषित केले होते आणि ते हटविण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती.
मात्र, रेल्वेच्या आदेशानंतर या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. यावरून महाराष्ट्राचे राजकारणही तापले आहे.
दरम्यान, ८० वर्षे जुने हनुमान मंदिर हटवण्याचा निर्णय रेल्वेने मागे घेतला आहे. मंदिर हटविण्याच्या रेल्वेच्या नोटसीला विरोध करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत हे कोणते हिंदुत्व आहे असा सवाल केला होता.
त्याचवेळी भाजप नेत्यांनीही मंदिर पाडण्याच्या आदेशाला विरोध केला होता. वाढता वाद पाहता रेल्वेने मंदिर हटवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने हनुमान मंदिराविरोधातील रेल्वे नोटीस भाजप नेते आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्या विनंतीवरून रोखण्यात आल्याचे म्हटले आहे.