लातूर : प्रतिनिधी
लातूर शराचे माजी महापौर तथा प्रभाग क्रमांक ५ चे माजी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी घरोघर भेट देत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या विविध समस्या समजून घेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत नागरिकांना त्यांनी आश्वस्त केले. कांही दिवसांपूर्वीच विक्रांत गोजमगुंडे यांनी जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. अनेक समस्यांचे जनता दरबारात जागेवरच निराकरण करण्यात आले. परंतू प्रत्येक नागरिक जनता दरबारास येऊ शकत नाही.
वेळेअभावी नागरिक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत याची जाणीव असल्यामुळे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी हर घर दस्तक मोहीम राबवत घरोघर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम राबवला. प्रभागाच्या विविध भागात पायी फिरत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यादरम्यान काही नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वस्त करीत माजी महापौर गोजमगुंडे यांनी प्रत्येक नागरिकाचे समाधान केले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागात सुरू असणा-या विविध विकासकामांची माहितीही त्यांना दिली. प्रभागातील प्रत्येक घराशी संपर्क साधून अडचणी समजून घेतल्याने अनेक समस्या सोडविण्यास मदत होते. आपला लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घरापर्यंत येऊन समस्या जाणून घेत असल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.