नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा जारी केला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान हेही उपस्थित होते. यासोबत हरियाणा निवडणुकीचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गेहलोत, अजय माकन आणि प्रताप सिंह बाजवा उपस्थित होते.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात वयोवृद्ध आणि महिलांना महत्त्व देऊन शेतक-यांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच पक्षाने लोककल्याणकारी धोरणांवरही लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या सात हमींमध्ये एमएसपीसाठी कायदेशीर हमी आणि सत्तेत आल्यास जात सर्वेक्षणाचाही समावेश आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणती आश्वासने देण्यात आली आहेत, याची माहिती प्रसारमाध्यमांना देताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही या हमींची अंमलबजावणी करू आणि म्हणूनच आम्ही त्याला ‘सात वचने, दृढ हेतू’ असे नाव दिले आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली काँग्रेसने १८ ते ६० वर्षे वयोगटातील प्रत्येक महिलेला ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि मासिक २ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच सामाजिक सुरक्षा बळकट करण्यासाठी, पक्षाने वृद्ध, अपंग आणि विधवा महिलांना दरमहा ६,००० रुपये पेन्शन आणि जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले आहे.
जाहीरनाम्यात एमएसपीची हमी
शेतक-यांच्या कल्याणाअंतर्गत काँग्रेसने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) साठी कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाने जात सर्वेक्षण आणि क्रिमीलेयरची मर्यादा ६ लाखांवरून १० लाख रुपये करण्याचे आश्वासनही दिले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना ३०० युनिट मोफत वीज आणि २५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जाणार आहेत. गरिबांना छत मिळेल, असे आश्वासन काँग्रेसने दिले. यासाठी १०० यार्डचा भूखंड आणि ३.५ लाख रुपये खर्चाचे दोन खोल्यांचे घर दिले जाणार आहे