सिंधुदुर्ग: मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण किंवा नारळ फेकणे हा दोन भावांमधील वाद आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्याविषयी काही बोलले की लोकांचा उद्रेक वाढतो. त्यामुळे संजय राऊत यांनी त्या पद्धतीने बोलणे बंद केले पाहिजे. हे ठाकरे कुटुंबाला शोभणारे नाही.
राज ठाकरे लोकनेते असल्याने त्यांना ऐकण्यासाठी हजारो लोक येतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेला काहीच लोक जमतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपा-या फेकण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. ठाकरे गटाच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर नारळ फेकून मारले होते. यामध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरही शेण फेकण्यात आले होते. याबाबत दीपक केसरकर यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. अॅक्शनला रिअॅक्शन देण्यासाठी मुसलमान लोक तुम्हाला शोधत आहेत, त्यांना आधी उत्तर द्या. त्यांनी तुम्हाला मोठे मताधिक्य दिले, त्यामुळे आता तुम्हाला ते शोधताहेत, आता ते तुम्हाला सोडणार नाहीत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.