25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रहिंमत असेल तर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा

हिंमत असेल तर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा

देशमुखांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुंबई : प्रतिनिधी
माजी न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एक अहवाल सरकारला सादर केला आहे. यात आपणास क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र हा अहवाल सरकार जाहीर करीत नाही. अनेकदा सरकारला विनंती केली पण त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला नाही. भाजप नेते तोंडघशी पडल्याने वाझे याचा वापर केला जात आहे. हिंमत असेल तर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा, क्लीन चिट दिल्याने हा अहवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लपवत आहेत, असा आरोप देशमुखांनी केला आहे.

दरम्यान, बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या पत्रानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. देशमुख यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. याला देशमुख यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

अनिल देशमुख म्हणाले, आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी फडणवीस यांना दहशतवादी सचिन वाझेचा वापर करावा लागत आहे. माझ्याविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे भाजप नेत्यांकडे नाहीत. यापूर्वी गृहमंत्री असताना माझ्यावर तोंडीच आरोप करण्यात आले होते. सुमारे दीड वर्ष मला तुरुंगात ठेवले. कुठलेही पुरावे सरकारला न्यायालयात दाखल करता आले नाहीत. मला मेरिटवर न्यायालयाने जामीन दिला.

फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच वाझे आपल्यावर आरोप करीत आहे, याचा पुनरुच्चार आज देशमुख यांनी केला. न्यायमूर्ती चांदिवाल यांनी ११ महिने चौकशी केली. तो अहवाल सरकारला दिला आहे. सध्या हा अहवाल गृह विभागाकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. राज्य सरकारकडे असलेला १४०० पानांचा तो अहवाल समोर आणावा. राज्य सरकार उघडे पडणार असल्याने अहवाल सार्वजनिक केला जात नसल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR