सुरक्षा दलाची मोठी कारवाई, नली बु-हान वानीचा साथीदार
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलास मोठे यश मिळाले आहे. कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे १० तास चाललेल्या चकमकीत दहशतवादी बु-हान वानीचा शेवटचा साथीदार फारुख नली आणि त्याचे चार साथीदार मारले गेले. फारुख नलीचा खात्मा हे सुरक्षा दलासाठी मोठे यश आहे. काश्मीर खो-यातील हिजबुल मुजाहिद्दीनचे नेतृत्व फारुख नली याच्याकडे होते.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दहशतदवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएस या भागातील कद्देर या गावाजवळ ही चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी हिजबुलच्या काश्मिरातील शेवटच्या कमांडरसह ५ दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये २ जवान जखमी झाले. या चकमकीनंतर आता सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने याविषयीची माहिती दिली आहे.
दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती समोर आली होती. सुरक्षा दलांना याविषयीची गुप्त बातमी मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलांनी या भागात एक संयुक्त कारवाई सुरू केली. लष्कराला या भागात काही संशयास्पद हालचाली दिसल्या. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सातत्याने अशा कारवाया होत आहे. दहशतवादांना यमसदनाला पाठवण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांनी २८ ऑक्टोबर रोजी जम्मूमधील अखनूर भागात ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हा सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हा सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन राबवण्यास सुरूवात केली आणि तीन दहशतवाद्यांना टिपले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.