अहमदाबाद : वृत्तसंस्था
फसवणुकीच्या नवनवीन पद्धती उदयास येत आहेत. एकाने सराफा व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. फसवणूक करणा-याने व्यावसायिकाला बनावट नोटांचे बंडल दिले. ज्यावर महात्मा गांधी नसून अभिनेते अनुपम खेर यांचे चित्र छापलेले होते.
सराफा व्यापा-याची फसवणूक करून भामटे फरार झाले. ही संपूर्ण फसवणूक १.३० कोटी रुपयांची आहे. सोन्याच्या बिस्किटांच्या बदल्यात व्यावसायिकाला चिल्ड्रन बँकेच्या नोटा मिळाल्या. अहमदाबादच्या माणेक चौकातील दोन व्यापा-यांमध्ये २१०० ग्रॅम सोन्याची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सीजी रोडवर असलेल्या अंगडिया फर्ममध्ये सोने पोहोचवण्याचे ठरले आणि रोख रक्कम घेऊन तीन आरोपी नोटा मोजण्याचे मशीन आणि नोटा घेऊन उभे होते.
सोन्याच्या डिलिव्हरीच्या वेळी आरोपींनी व्यावसायिकाच्या कर्मचा-यांना १.३० कोटी रुपयांच्या चिल्ड्रन नोटा दिल्या होत्या. उर्वरित ३० लाख रुपये मोजा आणि बाजूच्या कार्यालयातून घेऊन या, असे सांगून आरोपी पळून गेला. या घटनेची माहिती व्यावसायिकाला समजताच त्यांनी नवरंगपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.