23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्र१३ बँकांना खाती गोठविण्यासाठी पत्र

१३ बँकांना खाती गोठविण्यासाठी पत्र

आरोपींच्या खात्यांवर होणार कारवाई
बीड : प्रतिनिधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणातील ४ फरार आरोपींची खाती असलेल्या १३ बँकांना सीआयडीच्या पथकाने खाती गोठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक म्हणजे या ४ फरारी आरोपींची बँक खात्यांची संख्या ३ आकड्यात आहे. आरोपींचे आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील माहितीशी संलग्न असलेले ही सर्व खाती आहेत. मालमत्ता जप्तीच्या संदर्भात सीआयडी पथकाने कार्यवाही पूर्ण केली असून न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा सध्या आहे. न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच जप्तीची कारवाईदेखील केली जाणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या महिलेची आजही चौकशी करण्यात आली.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपी आता सीआयडीच्या रडारवर आहेत. फरार आरोपींचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे बँक खाते गोठवण्यात येत आहे. १०० हून अधिक खाती गोठवण्यात आली आहेत. याबरोबरच वाल्मिक कराडांसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी कोर्टाची परवानगी मागण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपी अटकेत असून उर्वरित तीन आरोपी तसेच खंडणी प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात आहे. आता सीआयडीने संबंधित आरोपी व त्यांच्या नातेवाईकांचे आधार लिंक असलेले सर्व खाते सीज करण्याचे पत्र बँकांना दिले आहे, अशा १३ बँका असून त्यांच्याकडे असलेले बँक खाते आता गोठवण्यात आले आहेत. या खात्यामध्ये नेमकी किती रक्कम आहे, याबाबतची माहिती लवकरच समोर येऊ शकणार आहे.

आणखी २५ जणांची चौकशी
सीआयडीच्या पथकाने आज दिवसभरात २५ जणांची चौकशी केली असून आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी करण्यात आली आहे आणखी ब-याच जणांची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच खुनाच्या घटनेनंतर जे मोबाईल गाडीत सोडले, त्याचा फॉरेन्सिक डेटा येण्यासाठी पाच दिवस लागणार असल्याची माहिती समोर आली असून हा डेटा मिळाल्यानंतर आणखी धक्कादायक खुलासे होऊ शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR