सोलापूर : मंडळ अधिकारी पाच असलेली संख्या नऊ झाली, तलाठी सज्जे २५ चे दुप्पट ५० झाले मात्र अप्पर तहसील कार्यालय मंजुरीची उपेक्षाच सुरू आहे. अपर तहसीलचा प्रस्ताव पाठविणारे नऊ तहसीलदार व सहा प्रांताधिकारी बदलून गेले मात्र उत्तर तहसीलचे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय काही झाले नाही.
शासनदरबारी गरज बघून आदेश निघाले असते तर उत्तर तहसीलचे विभाजन झाले असते. उत्तर तहसील कार्यालयावर कामाचा भार अधिक वाढला आहे. सोलापूर शहराच्या लगतच्या शेतात आता टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचे शहरीकरण झाल्याने तलाठी, मंडल अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होती. शासनाने उत्तर तालुक्यात पाच मंडळाची संख्या ९ तर २५ तलाठी सज्जाची संख्या ५० इतकी केली आहे.
१० वर्षांखालीच गरज पडल्यानेच मंडळ व तलाठ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली. मात्र, तहसील कार्यालयातील कर्मचारी संख्या पूर्वीइतकीच आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शहरातील कामांची उरक होत नसल्याने वेळ मिळाली तर ग्रामीण जनतेची कामे होत आहेत.त्यामुळेच अप्पर तहसीलची गरज निर्माण झाली आहे. २०१५ पासून अपर तहसीलचा प्रस्ताव बासनात असून प्रस्ताव पाठविणारे ९ तहसीलदार व ६ प्रांताधिकारी बदलून गेले.
मात्र, अप्पर तहसील काही मंजूर झाले नाही.अनेक वर्षे प्रयत्न केले मात्र अप्पर तहसील कार्यालय मंजूर होत नाही. स्वतंत्र पोलिस स्टेशन, तालुका क्रीडा संकुल, ५० खाटांचे रुग्णालय, खरेदी खत (मुद्रांक) कार्यालय तालुक्यासाठी स्वतंत्र असावे, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला यश येत नाही. वडाळ्यात अप्पर तहसील होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तालुक्यातील ४० गावांसाठी स्वतंत्र अपर तहसील मंजूर व्हावे, ही मागणी आहे.असे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी सांगीतले.