मुंबई : प्रतिनिधी
मागील चार महिन्यांत महाराष्ट्रात आइस्क्रीम विक्रीत तब्बल २५०० कोटींची उलाढाल झाली. एवढी उलाढाल आजपर्यंतचा उच्चांक मानली जात आहे. कोरोना काळात आइस्क्रीम उद्योगाला मोठा फटका बसला होता. मात्र, ते नुकसान भरून काढत हा उद्योग ‘नफ्यात’ आला आहे.
राज्यातील उलाढाल
फेब्रुवारी ते मे महिना
वर्ष उलाढाल
२०२२- १२०० कोटी
२०२३- १५०० कोटी
२०२४- २५०० कोटी
यंदाचा उन्हाळा सर्वाधिक दाहक ठरला. राज्यातील तापमान ४० ते ४५ अंश दरम्यान राहिले. याचा फायदा आइस्क्रीम उद्योगाला झाला. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत २५०० कोटींची उलाढाल झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.
कोरोनात १ हजार कोटींचा फटका
महाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाला वर्ष २०२१ मध्ये कोरोनामुळे सुमारे ८०० ते १ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. महाराष्ट्रात आजघडीला लहान-मोठे आइस्क्रीमच्या ३५० कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल ५० लाखांपासून कोट्यवधीपर्यंतची आहे.
आइस्क्रीम विक्रीत पुणे नंबर वन
राज्यात सर्वाधिक आइस्क्रीम पुण्यात विक्री होते. त्या पाठोपाठ मुंबई, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरचा नंबर लागतो. पूर्वी हंगामातच आइस्क्रीम खाल्ले जात होते, पण आता वर्षभर आइस्क्रीमची विक्री होते. हंगामात राज्यात २५०० कोटींची उलाढाल झाली. संपूर्ण वर्षभरात ३ हजार कोटींपर्यंत आइस्क्रीमची उलाढाल पोहोचेल. राज्यात आइस्क्रीमचे उत्पादन होते, याशिवाय गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातूनही आइस्क्रीम विक्रीला येत आहे.