लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे. मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी फे-यामध्ये सर्वाधिक २८ मतमोजणी फे-या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात होतील. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात २७, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात २६, निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात २५ आणि उदगीर व लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रत्येकी २४ मतमोजणी फे-या होणार आहेत. तसेच टपाली मतमोजणीची १ फेरी होणार आहे. एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मतदान यंत्रातील मतमोजणीच्या २८ आणि टपाली मतमोजणीची १ फेरी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल. मतदान यंत्रावरील प्रत्येक फेरीला अंदाजे २० मिनिटे ते ३० मिनिटे लागण्याची शक्यता आहे.
मतमोजणीसाठी लातूर निवडणूक प्रशासन सज्ज झाले आह. निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासोबत १७ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीचे कामकाज पाहणार आहेत. तसेच मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील निरंजन कुमार आणि सागर चक्रबर्ती या दोन अधिका-यांची नियुक्त्ती केली असून दोघेही लातूर येथे दाखल झाले आहेत. मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणी केंद्रावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणीची कार्यवाही होईल. तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून १० टेबलवर टपाली मतमोजणी होईल.
सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. जवळपास ४५० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे.