32.5 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

मोफत विजेसाठी ३ हजार कोटींची तरतूद

नागपूर : प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या पुरवणी मागणीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश देणा-या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी ३ हजार १५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने जुलै महिन्यातील अधिवेशनात विक्रमी ९४ हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. यावेळी सरकारने पुरवणी मागणीतून निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ५१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांवर १९ आणि २० डिसेंबर अशी दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.

आज सादर झालेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी ८ हजार ८६२ कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर २१ हजार ६९१ कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत. सरकारने ५ हजार २३४ कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिला. यात केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत ५० वर्षासाठी बिनव्याजी कर्ज योजनेसाठी ३ हजार ७१७ कोटी, विविध पाटबंधारे महामंडळाना भाग भांडवल अंशदान म्हणून १ हजार ९०८ कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी १ हजार २५० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारचे दुय्यम कर्ज आणि समभागासाठी १ हजार २१२ कोटी, राज्यातील पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी कर्जासाठी १ हजार २०४ कोटी, दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी, अंगणवाडी कर्मचारी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी राज्य हिस्सा म्हणून २९० कोटी रुपये, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या वाढीव मानधन, इतर भत्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी १२८ कोटी २४ लाख रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR