पुणे : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेतील ‘मीरकॅट रेडिओ’ दुर्बिणीच्या साहाय्याने केलेल्या निरीक्षणातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खगोलशास्त्रज्ञांना तब्बल ९ लाख ७१ हजार १८० रेडिओ स्रोतांचा शोध लागला आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना एकाच रेडिओ अवकाश सर्वेक्षणातून जवळपास १० लाख स्रोत हाती लागले आहेत. या शोधात पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) शास्त्रज्ञांचा सहभाग आहे.
मिरकॅट रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाशातील रेडिओ स्रोतांची माहिती संकलित करून त्यांचा स्वतंत्र कॅटलॉग तयार करण्यात आला आहे.
यानिमित्ताने ‘मीरकॅट’च्या साहाय्याने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे नोंदविलेल्या स्रोतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘कॅटलॉग’ तयार झाला आहे. दशलक्ष किंवा त्याहून जास्त स्रोत असलेल्या मूठभर रेडिओ कॅटलॉगपैकी हा एक कॅटलॉग असणार आहे. ‘मीरकॅट रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने मिळालेल्या असंख्य सखोल प्रतिमांसह कच्च्या स्वरूपातील माहिती संकलित करून ठेवण्यासाठी अत्याधुनिक मांडणी आयुकामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.
दुर्बिणीच्या साहाय्याने संकलित झालेल्या प्रतिमा आणि कॅटलॉगचे विश्लेषण आणि त्यातील संशोधन नागरिकांसमोर आणण्याचे काम जर्मनीमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी (एमपीआयएफआर) येथे केले जात आहे.