मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकली आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अंगुरी भाभीने या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्याविरोधात जवळपास दहा वर्षांपूर्वी केलेल्या छळाच्या आरोपांबाबत शिल्पाने नुकतेच केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने १० वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांविषयी दिलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये शिल्पा शिंदेने संजय कोहली यांच्याविरोधातील आरोपांबाबत भाष्य केले. या पॉडकास्टमध्ये ती स्पष्टपणे म्हणाली की, ‘मला हा शो सोडायचा होता म्हणून मी पोलिस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तेव्हा खोटी तक्रार केली. त्यानंतर आमच्यात सेटलमेंट झाली, त्यांनी मला तीन महिन्यांपासून बाकी असलेले माझे मानधन दिले. तर, मी त्यांना आश्वासन दिले की मी या घटनेबद्दल परत कधीच काही बोलणार नाही. या सेटलमेंटनंतर मी अखेर शो सोडला.’ हा पॉडकास्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर ट्रोलिंग होत आहे. काही सोशल मीडिया नेटक-यांनी तिच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
हँडलवरून मुंबई पोलिसांना टॅग करत शिल्पा शिंदेच्या अटकेची मागणी केली आहे. संस्थेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पॉडकास्टमधील तिच्या वक्तव्याची क्लिप जोडण्यात आली असून, निर्मात्याविरुद्ध खोटा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक कलाकार या प्रकरणावरून सोशल मीडियावर शिल्पावर नाराजी व्यक्त करत आहेन. हीना खान, पूजा बेदी यांसारख्या अभिनेत्रींनी या प्रकाराचा आणि शिल्पाच्या वागण्याचा विरोध केला आहे.
















