अकोला : बाळापूर तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेणा-या सहा विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करणारा नराधम शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याला उरळ व अकोला पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले असता, न्यायाधिश ए. डी. क्षिरसागर यांनी २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उरळ नजीकच्या एका गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद मनोहर सरदार हा शिक्षक गणित व विज्ञान शिकवतो. शिकवणी वर्गाच्या नावाखाली हा शिक्षक मुलींसोबत वाइट उद्देशातून संवाद साधून शारिरिक लगट करीत होता. मोबाइलमधील अश्लिल व्हीडीओ दाखवून मुलींना लज्जा निर्माण होइल, अशा प्रकारे बोलत असे. शिक्षकाचे अश्लिल संभाषण न पटल्यामुळे सहा विद्यार्थीनींनी शिकवणी वर्गाला जाणे बंद केले. त्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकाने याच सहा मुलींचा लैंगिक छळ सुरू केला. हा प्रकार अस होत असल्यामुळे या सहा विद्यार्थिनींनी ही बाब शाळेतीलच एका महिला शिक्षिकेला सांगितली. महिला शिक्षिकेने घडलेला सर्व प्रकार चाइल्ड हेल्पलाइनवर सांगितल्यानंतर या अश्लाघ्य प्रकाराला वाचा फुटली.
शिक्षकाविरुध्द तातडीने कारवाई
धाडस दाखवत सहा विद्यार्थीनींनी एकत्र येत उरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शिक्षकाला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. उरळ पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुध्द पोक्सो कायद्याच्या कलम ८,१० व १२ नुसार तसेच बीएनएस कलम ७४ व ७५ अन्वये गुन्हा दाखल केला.