अहमदपूर : मराठा आरक्षणाची मागणी करणा-या आंदोलकांनी आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत, लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परळी येथे धनंजय मुंडे यांनी आयोजीत केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्धघाटनासाठी आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते मुंबईकडे निघाले असता लातूरमधील अहमदपूरमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफ अडवत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. दरम्यान गेल्या एका वर्षापासून राज्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे. यासाठी दरम्यानच्या काळात सरकारनेही आरक्षणाबाबत प्रयत्न केले. पण मराठा समाजाच्या अपक्षा त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत.
अशात गेल्या महिन्यापासून मराठा समाजातील लोकांनी सत्ताधा-यांसह विरोधकांनाही धारेवर धरले आहे. गेल्या काही दिवसांत मराठा आंदोलकांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही घेराव घालत प्रश्न विचारले आहेत.