पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदद्वारा आयोजित ३१व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण गायकवाड यांची निवड झाली असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.
समता, बंधुता व एकात्मता ही मूल्ये केंद्रस्थानी मानून शिव, शाहू, फुल,े आंबेडकर यांच्या विचाराने सामाजिक प्रबोधन व सामाजिक परिवर्तन याकरिता गायकवाड गेली ३५ वर्षे कार्यरत आहेत. मराठे शुद्र, हिंदू की ब्राह्मणी, आरक्षण, शिवचरित्रातून रामदास व दादोजी कोंडदेव हटावो, संभाजी ब्रिगेड एक अभ्यास, मराठा क्रांती मोर्चा आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले असून सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर ३ हजारांहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत, ९ व १० मे २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कराड या ठिकाणी हे संमेलन संपन्न होणार असून या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्र पवार करणार आहेत. ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलन, असे भरगच्च कार्यक्रम होणार असून या संमेलनात देशभरातील ९०० साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी पुणे, मुंबई, नांदेड, उदगीर, तुळजापूर, लातूर, धाराशिव, वणी, रत्नागिरी, गोंदिय, शेवगाव, बारामती, मंठा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी संपन्न झाले होते. नारायण सुर्वे, मंगेश पाडगांवकर, द. मा. मिरासदार, शिवाजी सावंत, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, सुवर्णा पवार, श्रीपाल सबनीस, गंगाधर पाणतावणे, जनार्दन वाघमारे, भास्कर चंदनशिव, मुरहरी केळे आदी मान्यवर साहित्यिकांनी यापूर्वी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे,
नुकतीच डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वांनुमते संमेलनाध्यक्ष म्हणून प्रवीण गायकवाड यांची निवड करण्यात आली.