बारामती : बारामती लोकसभेला विजय शिवतारे यांनी घेतलेली बंडाची भूमिका कायम असून त्यांनी आज अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शिवतारे यांनी पुन्हा एकदा घणाघाती प्रहार करत गंभीर आरोप केले.
शरद पवारांचा माणूस असल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विजय शिवतारे म्हणाले की, मी लढतोय ते जिंकण्यासाठीच. माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. दरम्यान, विजय शिवतारे यांनी आज अजित पवार यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. शिवतारे म्हणाले की, राष्ट्रवादीकडून काही गैरसमज पसरवले जात आहेत की मला फक्त अजित पवार यांना हरवायचे आहे आणि मी शरद पवार यांचा माणूस आहे. मात्र, असा नालायकपणा मी कधीच करणार नाही.
रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम
मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. त्यांनी सांगितले की, ही लढाई खूप मोठी आहे. सुनील तटकरे म्हणत आहेत की, शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहून देतो ते आम्ही शोधत आहोत. ते म्हणाले की, मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांनी शेतक-यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प राहिला. शरद पवार यांना देखील माहीत आहे शिवाजी विजय शिवतारे कोण आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम असल्याचे ते म्हणाले.