20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रअडीच वर्षांनी ‘मी पुन्हा येईन’

अडीच वर्षांनी ‘मी पुन्हा येईन’

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महायुती सरकारमध्ये पाच वर्षे मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिले. मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज असले तरी ते उघडपणे दाखविले नाही. नुकताच त्यांनी मतदारसंघात आभार मेळावा घेतला आणि ‘अडीच वर्षांनी मी पुन्हा येईन’, म्हणत मंत्रिपदाची आशा असल्याचे सांगितले.

दरम्यान, सरकारमध्ये आपले वेगळे वजन आणि अस्तित्व राखणा-या अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद न मिळाल्याची सल आहे. यापेक्षा त्यांच्या समर्थकांना आपले साहेब आता मंत्री नाहीत हे बघवत नाही. दुसरीकडे मंत्रिपद आणि सामाजिक न्याय खाते मिळालेल्या संजय शिरसाट यांचे छत्रपती संभाजीनगरात काल भव्यदिव्य असे स्वागत झाले.

चार तास मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण असा सगळा झगमगाट पाहून अनेकांचे डोळे दिपले. सत्तार यांना मंत्रिपद मिळाले असते तरी असेच स्वागत त्यांचे करता आले असते, पण ही संधी त्यांच्या समर्थकांना मिळाली नाही. मात्र आता मंत्री संजय शिरसाट यांच्यापेक्षाही मोठे आणि भव्य स्वागत करण्याची तयारी सत्तार समर्थकांनी चालवली आहे.

आठवडाभर विविध उपक्रम
अब्दुल सत्तार यांचा १ जानेवारीला वाढदिवस. मंत्रिपदाच्या काळात सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आठवडाभर विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक उपक्रमांच्या रेलचेलीतून सत्तार दरवर्षी मोठे शक्तिप्रदर्शन करत असतात. यावेळी मंत्रिपद मिळाले नसले तरी या माध्यमातून अब्दुल सत्तार ‘शक्ती’ दाखवणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR