रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर येथील शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर तालुक्यातील २ हजार ६०० शेतक-यांनी सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केलेली असून ७० ते ८० क्वींटल सोयाबीनची खरेदी झालेली आहे तर अडीचशे शेतक-यांंना खरेदी संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोयाबीन ऑनलाईन नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
शेतकरी ऑनलाईन सोयाबीनची नोंदणी करीत असतांना अचानक पाच ते सहा दिवस नोंदणीची प्रक्रिया पूर्णत: बंद पडली होती. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतक-यांना मिळेल त्या भावाने बाजारात सोयाबीन विकून दिवाळी साजरी करावी लागली. याच दरम्यान प्रत्यक्ष खरेदी होत नव्हती. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनमध्ये २० टक्के ओलावा असल्याचे कारण देत प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झालेली नव्हती. बाजारात भाव मिळत नसल्याने बहुभूधारक व मध्यम शेतक-यांनी सोयाबीनच्या गंजी लावल्या तर कांही अत्यल्पभूधारक शेतक-यांंनी राशी करून मिळेल त्या भावाने बाजारात सोयाबीन विकून दिवाळी साजरी केली. शासनाने सोयाबीनचा प्रतिकिं्वटल भाव ४ हजार ८९२ रुपये जाहीर केला त्याचा शेतक-यांना फायदा होईल या अपेक्षेने जाचक अटी असतांनाही शेतक-यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली. आतापर्यंत २ हजार ६०० शेतक-यांची नोंद झाली आहे.
बाजारात व्यापान्यांकडून सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपये प्रतिकिं्वटल भाव मिळत आहे. त्याहीपेक्षा कमी भावाने म्हणजेच ३ हजार ८०० रुपयांप्रमाणे सोयाबीन (पलटी) खरेदी होत आहे. आधारभूतकिंमतीपेक्षा हजार ते बाराशे रुपये प्रतिकिं्वटलचा तोटा शेतक-यांंना सहन करावा लागत आहे. यातून व्यापारी शेतक-यांची अक्षरश: लूट करीत आहेत. एकीकडे शासन सोयाबीनचे दर वाढवित नाही तर दुसरीकडे व्यापा-याकडून होणारी लूट थांबत नाही. यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. १५ ऑक्टोबरला
प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. आजपर्यंत २ हजार ६०० शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. १२ टक्के ओलावा गृहीत धरून सध्या सोयाबीनची खरेदी सुरु आहे.