जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील घोणसी ते आतनूर दरम्यान अतनूर गावाजवळ तिरू नदीवर मोठा पूल होता. या ठिकाणी असलेला पूल जुना झाल्यामुळे नवीन पूल मंजूर करण्यात आला होता, यामुळे जुना पूल तोडून या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे काम सुरू होते. अतनूर तसेच इतर दहा गावांना जाण्यासाठी पाईप टाकून बाजूला पर्यायी पूल करण्यात आला होता. तो पूल दि २२ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामुळे जवळपास दहा गावाचा संपर्क गेल्या २४ तासांपासून तुटला आहे. प्रशासनाच्या एका चुकीमुळे अतनूर ग्रामस्थांंना अडचणीचा सामना करावा लागत आहे . जळकोट तालुक्यातील अतनूर गावाजवळ असलेल्या तिरू नदीवर नवीन पूल मंजूर झालेल्या पुलाचे काम जून महिन्यामध्ये या पुलाचे काम सुरू करण्यात आले.
जुना पूल आहे तसाच ठेवून नवीन पुलाचे बांधकाम बाजूला करणे अपेक्षित असताना जुना पुल पूर्णपणे पाडून टाकण्यात आला. जुलै महिना संपत आला तरी पुलाचे काम पूर्ण झाले नाही. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिरू नदीला पाणी येते जळकोट तालुक्यामध्ये थोडाही पाऊस झाला की तिरू नदी भरून वाहते, अशा परिस्थितीत मुरूम आणि मातीने बनविण्यात आलेला पूल या ठिकाणी टिकू शकत नाही, हे माहिती असतानाही असा कच्चा पूल बनवण्यात आला .
दि २१ जुलैच्या मध्यरात्री मोठा पाऊस झाल्यामुळे नदीला पाणी आले आणि या पाण्यामध्ये पर्यायी
पूल वाहून गेला. उदगीर तसेच जळकोटला येण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर या ग्रामस्थांना करावा लागत आहे. मोठा फेरा मारून गावक-यांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत आहेत. पक्का पुल पाडण्याची घाई का केली असा सवाल आरपीआयचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे यांनी केला आहे. पुलाचे काम करणा-या कंट्रक्शनवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.