22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeसंपादकीयअतृप्त आत्म्यांचे आगर!

अतृप्त आत्म्यांचे आगर!

राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा सागर असेल तर सध्या महाराष्ट्राची स्थिती अतृप्त आत्म्यांचे आगर अशी झाली आहे असे म्हणावे लागेल. जीवनातील समस्या मोठी आव्हाने उभी करतात आणि त्यांचा मुकाबला करून मार्गक्रमण करणे याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ म्हणतात. महाराष्ट्राला हेच करावे लागणार आहे. कारण निवडणुकीत पाशवी बहुमत मिळूनही महायुतीतील अतृप्त आत्म्यांनी सरकार स्थापनेबाबत घोळात घोळ अन् पायघोळ घातला. महायुतीला बहुमत मिळून दहा दिवस उलटले तरीही राज्याला सरकार का मिळत नाही असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. युतीतील तीनही पक्षांचे मुख्यमंत्रिपदावर, मंत्रिपदांवर एकमत होत नसल्याने सरकार स्थापन करण्यास वेळ लागत आहे असे सांगितले जात आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा हा अपमान नव्हे काय? सरकार स्थापनेबाबत तिन्ही पक्षांचे एकमत होत नसेल तर पुढे काय होणार? यालाच राजकारण म्हणायचे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मिश्कील बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते सहज बोलून जातात आणि खळबळ उडून जाते.

राजकारणासंदर्भात गडकरी म्हणाले, राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा सागर असून येथे प्रत्येक व्यक्ती दु:खी आहे. प्रत्येक व्यक्तीला ते सध्या ज्या पदावर आहेत त्याहून अधिक मोठ्या पदाची लालसा आहे. जीवन हे तडजोड, सक्ती, मर्यादा आणि विरोधाभास यांचा खेळ आहे, असेही गडकरी म्हणाले. राजकारणात प्रत्येक जण दु:खी आहे. एखादा नगरसेवक आपण आमदार का नाही म्हणून दु:खी आहे, आमदार मंत्रिपद नसल्याने दु:खी आहे. मंत्रिपदी वर्णी लागली की चांगले खाते मिळाले नाही म्हणून दु:खी, मुख्यमंत्रिपद मिळत नाही म्हणून दु:खी तर मुख्यमंत्रिपदी असलेली व्यक्ती पक्षश्रेष्ठी कधी बोळवण करतील म्हणून दु:खी! सध्या एकनाथ शिंदे यांची अशीच स्थिती झाली आहे. महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर राज्यात नवे सरकार सहज स्थापन होईल असे वाटले होते परंतु तसे झाले नाही. युतीत महत्त्वाच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अडून बसल्याने भाजप मेटाकुटीला आला आहे.

केंद्रातील मोदी सरकारचे स्थैर्य शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीवर अवलंबून असल्याने भाजपचे हात दगडाखाली सापडले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मन वळवण्यासाठी ‘संकट मोचक’ गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री ठाणे येथील शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली म्हणे. अजित पवार मात्र सरकार स्थापनेसंदर्भात भाजपश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. म्हणजेच महायुतीत सत्तासंघर्ष टिपेला पोहोचल्याचे दिसून येते. या रणधुमाळीत अजित पवारांना विशेष महत्त्व आल्याचे दिसते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन महत्त्वाच्या पदांवरून सध्या भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप गृहमंत्रिपद देण्यास इच्छुक नसल्यामुळे शिंदे यांनी आणखी ताणून धरल्यास दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला जाऊ शकतो. जर सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले तर शिंदे भाजपला केंद्रात आणि राज्यात बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतील.

तसे झाल्यास भाजपला त्याचा फटका दिल्लीतही बसू शकेल. एकनाथ शिंदे यांच्या बळावर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले आणि आता जास्त जागा निवडून आल्या म्हणून शिवसेनेला विसरले, अशी जनमानसात भाजपची प्रतिमा होऊ शकते. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपला गृहखाते स्वत:कडे हवे आहे, पण शिंदे यांच्या चाणाक्ष खेळीने भाजप हतबल झाली असून त्यामुळे सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे. दिल्लीतून गृहखाते देण्यास हिरवा कंदील मिळत नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे नाराज असून ते पुन्हा आजारी पडले आहेत. डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी दिवसभरातील सर्व बैठका रद्द केल्या. त्यामुळे महायुतीची बैठकही लांबणीवर पडली. अर्थात यामागे शिवसेना-भाजपमधील सत्ता संघर्षच कारणीभूत आहे. खातेवाटपात शिवसेना अडून बसल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

भाजप-शिवसेना यांच्यात खातेवाटपावरून जोरदार खडाजंगी सुरू असली तरी मिळतील त्या जागा पदरात पाडून घ्यायच्या अशी रणनीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून सर्वांत आधी हात वर केले होते आणि भाजपला पाठिंबा दिला होता. खातेवाटपासंदर्भात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. फार जोर न लावता अर्थ, सार्वजनिक बांधकाम, कृषी आदी महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याची राष्ट्रवादीची रणनीती दिसते. भाजपने आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बुधवारी (आज) भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल.

मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले असले तरी भाजपकडून शेवटच्या क्षणी धक्कातंत्राचाही वापर केला जाऊ शकतो. तसा भाजपने लाडक्या बहिणींना धक्का दिला आहेच! महायुती सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेत दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येतील असे आश्वासन महायुतीतील नेत्यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. आता युती सरकार सत्तेत आले असले तरी या योजनेतील पात्र महिलांना २१०० रुपयांसाठी पुढील भाऊबीजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाढीव रक्कम देण्याआधी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. तोपर्यंत अतृप्त आत्मे काय करतील ते सांगता येत नाही. लाडक्या बहिणींनी आशा सोडू नये!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR