16.9 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeनांदेडअनधिकृत होर्डिंग्ज विरोधातील मनपाची मोहीम थंडावली

अनधिकृत होर्डिंग्ज विरोधातील मनपाची मोहीम थंडावली

नांदेड : प्रतिनिधी
घाटकोपर येथील घटनेनंतर राज्यभरातील अवैधरित्या लावण्यात आलेल्या होर्डींग्जच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्याची अंमलबजावणी नांदेड शहरात अत्यंत गाजावाजा करून करण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये अधिकृत वगळता २४ होर्डींग्ज अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी केवळ ६ होडींग्ज हटविण्यात आले आहे. त्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राज्य शासनाच्या आदेशानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मनपा पदाधिका-यांची एक बैठक घेऊन अनधिकृत होर्डींग्ज कुठे कुठे आहेत यासाठी सर्वे करण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर लावण्यात आलेल्या होर्डीग्जच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. यासाठी मनपात अधिकारी – कर्मचा-यांची बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या ६ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. यात १४९ होर्डींग्ज आढळून आली. तर यापैकी २४ होडींग्ज अनधिकृत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. असे असतानाही केवळ ६ होर्डींग्ज हटविण्यात आली. उर्वरित होडींग्ज का हटविण्यात आली नाहीत, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या कारवाईलाही दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटला त्यानंतर मात्र ही मोहीम थंडावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान महापालिका हद्दीत होर्डींग्ज लावण्यासाठी महापालिकेने काही एजन्सींची नियुक्ती केली आहे.

या एजन्सीमार्फत मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांसह अन्य मोठ्या जाहिराती या होर्डींग्जवर लावण्यात येतात. मात्र जेथे होर्डींग्ज उभारण्यात येतात त्या इमारतीची स्थिती त्यासाठी अनुकूल असणे आवश्यक आहे. परंतु शहरातील काही जीर्ण झालेल्या इमारतीवरसुद्धा महाकाय लोखंडी होर्डींग्ज उभारण्यात आल्या आहेत. त्या इमारती धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर होर्डींग्ज उभारण्यात आलेल्या इमारतीचे सर्वच एजन्सीधारकाने स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल मनपा प्रशासनाकडे सादर करावा, असे आदेश मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. काहींनी अहवाल सादर केले आहेत मात्र काही ठिकाणी रेल्वे विभाग व एस.टी. महामंडळाच्या जागेत होर्डींग्ज उभारण्यात आल्या आहेत. तेथे कारवाई करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR