23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रअन्न-नागरी पुरवठा खात्याची अतिरिक्त जबाबदारी अजित पवारांकडे

अन्न-नागरी पुरवठा खात्याची अतिरिक्त जबाबदारी अजित पवारांकडे

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण मंत्री होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हा विभाग तात्पुरत्या स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या हातात घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी आली आहे.

दरम्यान, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागासंबंधी अनेक प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तात्पुरता या खात्याचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या ताब्यात आधीच अर्थ आणि उत्पादन शुल्क विभाग आहे, त्यात आता या तिस-या खात्याची भर पडली आहे. मात्र, हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला सोपवले जाईल, याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील धक्कादायक छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले. त्यामुळे विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्याने धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी विधान भवनात पार पडणार असून, धनंजय मुंडेंशिवाय ही पहिलीच बैठक असेल. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर कारवाईसंबंधीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR