निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील झरी येथे दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे झरी गावावर शोककळा पसरली आहे. पुतण्या श्रीकृष्ण व चुलती कस्तुरबाई जाधव यांच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच अपघातत प्रात:विधीसाठी जात असलेल्या महिलाही जागीच ठार झाली. या दुर्दैवी घटनेमुळे झरीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
निलंगा तालुक्यातील झरी येथे आज उदगीर निलंगा रोडवर सकाळी झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात झरी येथील श्रीकृष्ण अर्जुन जाधव वय १९ वर्षे हा चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव वय ३६ वर्षे हे दोघेजण आठ दिवसापूर्वीच खरेदी केलेल्या एम एच २४ बी व्ही २३७१ वरून शेताकडे दूध काढण्यासाठी जात होते. समोरून येणा-या कंटेनर चालकाने त्यांच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक डी डी ०१ आर ९०७१ हा हायगय व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने पुतण्या व चुलती दोघे जागीच ठार झाले तर या गावचे माहेरवाशी असलेली अक्षराबाई किशनराव सुरवसे वय ५५ वर्षे ही महिला पहाटे प्रात विधीसाठी जात असताना दुचाकीसह या महिलेलाही जोराची धडक लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे नवीन दुचाकीचेही अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे. निलंगा पोलीस ठाण्यात अर्जुन वामनराव जाधव यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक माधव प्रभू घोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरवसे हे करीत आहेत