मुंबई : प्रतिनिधी
सध्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची सातत्याने चर्चा सुरू आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. नुकतीच अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा पार पडली. प्रभादेवीच्या ‘सामना’ प्रेसजवळ ही सभा घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी दादर-माहीम मतदारसंघात आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. त्यामुळे अमितला नक्की निवडून आणणार, असा निर्धार व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी या सभेवेळी अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यावरही टीका केली. तसेच आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर त्यांच्यासाठी उमेदवार दिला नाही, याबद्दलही त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच अमित ठाकरेंसाठी कोणाकडेही भीक मागणार नाही , असेही ते म्हणाले.
अमितसाठी माझी एकच सभा
१९९५ मध्ये शिवसेनेसाठी माझ्या १७५ सभा झाल्या. अनेकांसाठी सभा झाल्या. त्यातल्या एकासाठी इथे देखील सभा झाली होती. आमच्या ठाकरेंच्या संपूर्ण प्रवासाची मूळ भूमी ही दादर-प्रभादेवी-माहीम ही सर्व आहे. जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या तीन पिढ्या या महाराष्ट्रासाठी काम करण्यात गेल्या. याच दादर-माहीम मतदारसंघात आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. अमितसाठी माझी एकच सभा आहे. मी प्रत्येकासाठी सभा घेतोय, असे राज ठाकरे म्हणाले.