लातूर : प्रतिनिधी
यंदा लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी शेतक-यांसह शेतमजूर, व्यापारी, व्यवसायिक, मजूर, छोटे-मोठे व्यवसायिकांसह पशु, पक्षी सर्वच जीव अडचणीत आले आहेत. अल्लाहची रहेमत बरसावी, सुख सरी कोसळाव्यात यासाठी दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता येथील ईदहागवर नमाज-ए-इस्तिसका अदा करण्यात आली आहे. नमाज-ए-इस्तिसकानंतर पावसासाठी अल्लाहजी; रहेमतवाली बारिश अता फर्माइये, अशी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली.
जेव्हा पाऊस पडत नाही किंवा दुष्काळ पडतो, तेव्हा मुस्लिम धर्मात नमाज-ए-इस्तिसका ही विशेष नमाज अदा केली जाते. नमाज-ए-इस्तिसकासाठी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाहवर एकत्र आले होते. सकाळी ८ वाजता मुफ्ती सोहेल कास्मी यांचे प्रवचन झाले. त्यांनी आपल्या प्रवचनात अल्लाहूतआलाकडे प्रार्थना केली. मानवी चुकामुळे कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, पुर, महापूर, धरणीकंप, वारा, वादळ, चक्रीवाद अशा घटना घडतात. या अल्लाह, मानवी चुकांना तूम्ही आपल्या पोटात घ्या, आम्हाला माफ करा. पावसाअभावी सर्वचजण संकटात सापडले आहेत. शेतक-यांचे अतोनात नुकसान होत आहेत. शेतक-यांना आधार देण्यासाठी, पशुपक्षांना जगवण्यासाठी रहेमतवाली बारिश अता फर्माइये, अशी प्रार्थना केली.
त्यानंतर मौलाना लायक कास्मी यांच्या मागे दोन रकात नमाज-ए-इस्तिसका झाली. नमाज-ए-इस्तिसकानंतर दुआ मागण्यात आली. यावेळी पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतक-यांसाठी मौलानांनी विशेष संदेश दिला. शेतक-यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, संकटाच्या काळात धीर सोडू नये आणि अल्लाहवर भरोसा ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. अल्लाहची रहमत व्हावी, भरपूर पाऊस पडावा आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवरील संकट दूर व्हावे, यासाठी मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या दुआ मागितली.
















