23.9 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeसंपादकीयअवकाळीचा तडाखा

अवकाळीचा तडाखा

गत काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. गत तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात धो-धो पाऊस पडतो आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचे बरसणे सुरू आहे. कर्नाटक किनारपट्टीजवळ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गत दोन आठवड्यांपासून राज्यात मान्सूनपूर्व मध्यम सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यता आहे. तर १० जूनला मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून तळकोकणात धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अवकाळी पावसाचा सर्वांत मोठा फटका शेतक-यांना बसला. उभ्या पिकांवर परिणाम झाला असून भात रोपवाटिका, कांदा, भाजीपाला, आंबा आदींचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामानातील अस्थिरतेमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना आणि विजांच्या कडकडाटामुळे जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या. एकीकडे अवकाळी पावसामुळे नुकसान तर दुसरीकडे वेळेआधी मान्सून येण्याची शक्यता यामुळे हवामानाच्या अनिश्चिततेचे दर्शन घडत आहे. बुधवारी लातूर शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा हैदोस सुरू आहे. गत २० दिवसांत जिल्ह्यात सुमारे ८१ मि.मी. पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस झाल्याने पेरणी करावी की नाही अशी शेतक-याची द्विधा मन:स्थिती झाली आहे. पेरणीनंतर पिकाची जोमात वाढ व्हावी यासाठी १०० मि.मी. पावसाची गरज असते. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. गत पंधरवड्यात मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. वीज कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. ३९१ जनावरे मरण पावली आहेत. सुमारे ४ हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला शेतक-यांनी खरिपासाठी मशागत सुरू केली होती.

परंतु ३ मे पासून अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे मशागतीचे काम बंद पडले. वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, विजेचे खांब आणि झाडे आडवी झाली. शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. डाळिंब, केळी, आंबा फळपिकांसह टोमॅटो, कांदे, बाजरी, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात दीड हजार हेक्टरचे नुकसान झाले. निफाड तालुक्यात कांदा, मका, भाजीपाल्याचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हळद काढणीत व्यत्यय आला. विदर्भातील जिल्ह्यात गारपीट झाली. अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे शेतपिके, फळबागांचे नुकसान होऊन उत्पन्न सरासरीपेक्षा कमी होत आहे. हवामान विभागाने शेतक-यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. काढणी केलेली पिके निवा-यात ठेवावीत. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नये. पाणी साचलेल्या रस्त्यांवर सावधपणे वाहन चालवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरांना गळती लागणार नाही याची खात्री करा आणि स्वच्छ पाण्याचा साठा करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोकणात एप्रिलच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस पाऊस पडला. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे शहरातील मध्यमवर्ग सुखावत असला तरी शेतक-यांना मात्र मोठा फटका बसतो. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळीचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला. संत्रा, कांदा, ज्वारी, मूग आणि केळी पिकांचे नुकसान झाले. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारी, बाजरी, कांदा केळी यासह अनेक पिकांना फटका बसला. अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली असली तरी पाण्याची टंचाई अजून दूर झालेली नाही. टँकरची संख्या वाढतच आहे. सर्वाधिक टँकर हे छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत. हवामान बदलामुळे अवकाळीचा तडाखा वाढला आहे. पर्यावरणीय -हासाचा वेग पाहता २०५० पर्यंत हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. देशामध्ये महिलांना जलसंकटाचा सामना सर्वाधिक करावा लागतो. मे महिना महाराष्ट्रात कडक उष्णतामानाचा महिना मानला जातो,

परंतु यंदाचा मे महिना अजबच निघाला. मे महिन्यात असा दमदार पाऊस होणे दुर्मिळच. हवामानतज्ज्ञांच्या मते मे महिन्यातील या असामान्य पावसामागे अनेक कारणे आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याने, जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व प्रभाव दिसून येतो पण यंदा हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सूनपूर्व पावसाला लवकर सुरुवात झाली. सध्या एल-निनोचा प्रभाव कमी झाल्याने वातावरणात आर्द्रता वाढून पाऊस शक्य झाला. मानवनिर्मित कारणांमुळे वातावरणातील अस्थिरता वाढली आणि त्यामुळे हवामानात अनपेक्षित बदल, वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव, जंगलतोड इ. जिथे हवामान कोरडे असते तिथे मे महिन्यातील पाऊस दिलासा देतो मात्र, काही भागात आंबा, केळी, कापूस यासारख्या पिकांना फटका बसतो. पाणी टंचाई असलेल्या भागात हा पाऊस वरदान ठरू शकतो. यंदाचा मे महिना हवामानाच्या दृष्टीने अपवादात्मक ठरला. हा बदल तात्पुरता की कायमचा ते सांगणे कठीण आहे. अशा पावसासाठी जनतेने आणि प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR