27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रअसे मोर्चे महाराष्ट्रातच का?

असे मोर्चे महाराष्ट्रातच का?

नाशिक, संभाजीनगरमधील घटनांवरून रोहित पवारांचा सवाल

पुणे : प्रतिनिधी
निवडणुका जवळ येत असल्याने महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडवण्यासाठी काही धर्मांध शक्ती प्रयत्नशील असून असे मोर्चे गुजरातमध्ये का निघत नाहीत, ते महाराष्ट्रातच का निघतात? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील काही शहरांत या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. या वक्तव्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराजांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथील हरिनाम सप्ताहाला भेट दिली. यावेळी ते रामगिरी महाराजांसोबत एकाच व्यासपीठावर बसले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांचा संत म्हणून उल्लेख केला. यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, विश्वशांतीचा संदेश देणा-या संतांचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे धर्मांध शक्तींच्या मनसुब्यांना हा महाराष्ट्र नक्कीच उधळून लावेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

अशातच आता नाशिक आणि संभाजीनगरमधील दंगलीच्या घटनांवरून रोहित पवारांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच राज्यात दंगली घडवण्यासाठी काही धर्मांध शक्ती प्रयत्नशील असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

जगाच्या कोणत्याही कोप-यात माणुसकीला काळिमा फासणा-या घटना घडल्या असतील तर माणूस म्हणून निषेध करायलाच हवा, जो आपण करतच आहोत. परंतु निषेध मोर्चांच्या आडून कुणी राजकीय पोळ्या शेकण्यासाठी द्वेष पसरवत असेल तर ते मात्र योग्य नाही. असे मोर्चे गुजरातसह इतर राज्यांमध्ये का निघत नाहीत? तिकडं निवडणुका नाहीत म्हणून का? महाराष्ट्रातच का निघतात? याचा विचार करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

भाजपचे पोसलेले संत : वडेट्टीवार
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रामगिरी महाराज हे भाजपचे पोसलेले संत असल्याचे म्हटले आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे रामगिरी कसले संत, मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पदावर असताना सांभाळून बोलावे. हे भाजपचे पोसलेले संत आहेत. तेढ निर्माण करणा-याला समर्थन असेल ही गंभीर बाब आहे. राज्यात दंगली घडवण्याची यांची मानसिकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR