सोलापूर: श्री उषा:काल दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अहिल्याबाई प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सी.बी शेख मॅडम, मुख्याध्यापक इस्माईल शेख, उर्दू विभागाच्या मुख्याध्यापिका मेहजबिन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशाला विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने एकल महिला पालकांचा फेटा बांधून व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
महिला पालकांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉल पास करणे, साडीच्या घड्या घालणे, शाब्दिक कोडे सोडवणे आणि संगीत खुर्ची, उखाणे घेण्याची स्पर्धा यांसारख्या खेळांचा समावेश होता. या उपक्रमांमध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळामधील विजय महिलांना इस्माईल उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका मेजबिन शेख यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी महिला सन्मान आणि स्त्रीशक्तीच्या महत्त्वावर आधारित भाषणे आणि एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी धेंडे यांनी केले, तर अल्पना जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.