गडचिरोली : प्रतिनिधी
एरवी पौष महिन्यात आंब्याला मोहोर लागतो. यंदा केशर, देवगड, दशेरी, लंगडा, आंब्यासह सर्व कलमी आंब्यांना मोहोर लागला आहे. मात्र, पौष महिना संपला तरीही गावरान आंबे बहरलेले नाहीत. त्यामुळे यंदा गावरान आंब्यांसह संकरित आंब्यांचे दर वधारण्याची शक्यता आहे.
जिल्हाभर मोठ्या प्रमाणात कलमी आंबे बहरावर आहेत. मात्र, गावरान आंबे मोहोरलेले क्वचितच दिसून येत आहेत. पूर्वीसारख्या गावरान आंब्याच्या आमराया राहिल्या नाहीत. काही शेतक-यांनी बांधावर अनेक ठिकाणी गावरान आंबे लावले आहेत. शिवाय, शेतक-यांकडून गावरानऐवजी कलमी आंब्याची लागवड करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आमराया संपुष्टात आल्या. आजही अनेकजण गावरान आंब्यांनाच पसंती देतात. मात्र, यंदा गावरान आंब्यांचे प्रमाण कमी आहे.
गावरान आंब्यांना एक वर्ष आड मोहोर का येतो?
एक वर्ष आड मोहोर येण्याची प्रवृत्ती आंब्यांमध्ये पाहायला मिळते. त्या आंब्यांच्या प्रजातीमधील हा आनुवंशिकपणा आहे. ही प्रवृत्ती संकरित आंब्यांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे संकरित आंबे लागवडीकडे शेतक-यांचा कल आहे.
लोणची बनविण्यासाठी कै-यांचा तुटवडा
गावरान आंब्याची झाडे नष्ट होत असल्याने गावरान आंबा फार कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी, लोणचं बनविण्यासाठी गावरान कै-या मिळत नाहीत. अनेकजण तर वर्षभर रेडिमेड लोणची बाजारातून खरेदी करतात.