मुंबई : प्रतिनिधी
सतीश भोसले ऊर्फ खोक्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. त्यावर ‘आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा’, अशा शब्दांत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तूफान टोलेबाजी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले असतानाच बीडच्या शिरूर कासार तालुक्यात एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात मारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसले ऊर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, सतीश भोसले ऊर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून, हा आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, खोक्याच्या अटकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधावा, असे म्हणत सरकारवर टीका केली. पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो. मात्र, गैरसोयीचा सापडत नाही. खोके म्हटले की, खोक्यामागचे बोके कोण आहेत तेही समजावे.
तसेच ते पुढे म्हणाले, हे खोके कुठून येतात?, सोन्याचा खजाना कुठून येतो?, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे, हे सर्व शोधून काढा. पोलिस दिसले की, आधी चड्डी पिवळी व्हायची. आता काय परिस्थिती आहे?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
प्रयागराजमधून खोक्याला अटक
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तो आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सतीश भोसले गुरुवारी स्वत: पोलिसांसमोर हजर होण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच बीड पोलिस आणि प्रयागराज पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.