बीड : बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पावकिलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आल्याने गावात मोठी चर्चा होती. यातील एक दगड शेतक-याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आल्याचे दिसून आले. दुसरा दगड शेतक-याच्या घराशेजारील गायरान जागेत आढळून आला. या घटनेनंतर अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ गावात दाखल झाले होते. त्यांनी हे दोन्ही दगड ताब्यात घेतले असून आकाशातून पडलेले दोन्ही दगड उल्कापिंड असल्याचे स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी दिले आहे.
लिमगाव येथील शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंभोरे यांच्या घरावर सोमवारी पत्र्याला छिद्र पडून खाली दगड पडल्याचे दिसले. तहसील प्रशासनातील अधिका-यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहेत. शेतक-याने संबंधित दगडासंदर्भात ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाला कळवले होते. काही खगोलीय अभ्यासकांनी निमगावला भेट देऊन या दगडांची पाहणी केली. अभ्यासाअंती, साधारण ८० सेंटीमीटर आकाराचे हे उल्कापिंड असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
बीडमध्ये घडलेली घटना ही आशनीपाताशी संबंधित असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. जी छायाचित्रे आम्हाला प्राप्त झाली, त्याच्यावरून हे काँड्राईड स्वरूपाचा उल्कापिंड असल्याचे आढळून येत आहे. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या घराचा पत्रा फोडून एक दगड खाली पडला तर ज्या मुलांनी आकाशातून दगड खाली पडताना पाहिला त्यावरून तरी हा आशनीपाताचा प्रकार असावा असे जाणवत असल्याचे खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले. लवकरच या उल्कापिंडाला जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून त्याचे विश्लेषण करण्यात येईल तेव्हा नेमके चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.