जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील रामपूर तांडा येथे दि २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीमध्ये रामपूर तांडा येथील शेतक-यांनी आपल्या जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या २२००० कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्या. यासोबतच ७ ते ८ ट्रॅक्टर सोयाबीन तसेच तुरीचे गुळीही जळून खाक झाले आहे. यामुळे जनावरांना चारा कुठून आणावा असा प्रश्न शेतक-यांपुढे उभा टाकला आहे .
जळकोट तालुक्यातील रामपूर तांडा येथे दुपारी २ ते ३ दरम्यान अचानक गावाबाहेरील गवताला आग लागली. या आगीत हरिबा दासू राठोड ३००० मोहन सखाराम राठोड २००० , तुळसाबाई राजाराम राठोड ३०००, किसन थावरू राठोड २०००, दामू लक्षू राठोड ३०००, गोविंद काशीराम जाधव २००० , सिताराम दामू राठोड १०००, बंडू रतन पवार २०००, शामराव दासू राठोड २००० या दहा शेतक-यांचा जवळपास २२००० कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्या आहेत . यासोबतच साठवून ठेवलेली गुळीही जळून खाक झाले आहे .
जनावराच्या चा-याला आग लागल्याबरोबर येथील सरपंच संदीप आडे यांनी तात्काळ अग्निशामक दलाला फोन केला अग्निशामक दलाची गाडी पोहोचली परंतुआग अधिक भडकल्यामुळे कडबा तसेच गुळी जळून खाक झाले. अगदी गावाच्या बाजूलाच हा कडबा साठवून ठेवण्यात आला होता. सुदैवाने ही आग रामपूर तांड्यापर्यंत पोहोचली नाही. तांड्यापर्यंत ही आग पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता तसेच वित्तहानी व जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली असती . दरम्यान घटनास्थळी तलाठी पाटील यांनी भेट देऊन नुकसान झालेल्या ठिकाणांचा पंचनामा केला. रामपूर तांडा येथील जवळपास दहा शेतक-यांचा जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळाला आहे.