22 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रआणखी किती मृत्यूंची वाट पाहणार?

आणखी किती मृत्यूंची वाट पाहणार?

नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात जीबीएसचा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहेत परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभीर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयूमध्ये असल्याचे समजते.

काल मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्यावे लागणा-या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.

जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाययोजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिरातबाजी केली जाते पण जीबीएससारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाययोजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर ते राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.

नायर रुग्णालयात एकाचा मृत्यू
सध्या महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही या आजाराचे थैमान पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत जीबीएस या आजाराने शिरकाव केला होता. त्यातच आता मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत जीबीएस आजारामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR