17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआपला तो बाब्या...!

आपला तो बाब्या…!

जेव्हा आपण दुस-याकडे बोट दाखवतो तेव्हा उर्वरित चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात. दुस-यावर आरोप करणे सोपे आहे, हे आरोप करताना आक्रमक वृत्ती दाखवली जाते, परंतु जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा शेपूट घालण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणावे? आज भाजपची अवस्था तशीच झाली आहे. आयुष्यभर काँग्रेसवर ‘घराणेशाही’चे आरोप करण्यात वेळ घालवला परंतु आज भाजप काय करतोय?… तेच ना! यालाच ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ असे म्हणतात. आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात विकास योजनांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशापुढे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. काँग्रेस व समाजवादी पक्ष घराणेशाही व लांगुलचालनाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी विकासाला कधीच प्राधान्य दिले नाही व ते भविष्यातही देऊ शकणार नाहीत. पंतप्रधान असे ठामपणे सांगतात म्हणजेच ते फार मोठे भविष्यवेत्ते असले पाहिजेत, नव्हे नक्कीच आहेत. पंतप्रधान पुढे म्हणाले, देशावर प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणा-या पक्षांनी विकासाकडे कानाडोळा करीत केवळ घराणेशाही व लांगुलचालनाचे राजकारण केले.

या पक्षांनी युवकांना कधीच संधी दिली नाही. त्यामुळेच आम्ही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा चंग बांधला आहे. आमचा हा अभिनव संकल्प राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार असून हे तर भ्रष्टाचार व घराणेशाहीची मानसिकता मिटवण्याचे अभियान आहे. तिस-यांदा पंतप्रधान बनण्याचा बहुमान मिळाल्याने आपण तीनपट अधिक गतीने कामांचा धडाका लावल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचा तसेच सूर्य-चंद्र उगवण्याचा व मावळण्याचा क्रम आपल्याच अभियानाचा भाग असल्याचे पंतप्रधान म्हणाले नाहीत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हटला पाहिजे. काँग्रेस व समाजवादी पक्षाने कधीच काशीचा विकास केला नाही आणि ते करू शकणार नाहीत असे भाकितही पंतप्रधान मोदींनी केले आहे.

म्हणजे पंतप्रधान मोदी हे बाबा वेंगापेक्षाही मोठे भविष्यवेत्ते आहेत यात शंका नाही. सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘घराणेशाही’ची सांगड घालावी लागेल. काँग्रेससह अन्य पक्षांवर ‘घराणेशाही’चा आरोप करणा-या भाजपने विधानसभेसाठी रविवारी जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीवर ‘घराणेशाही’चा पगडा दिसून येतो. दुस-याच्या ताटातील कुसळ दिसणा-या भाजपला स्वत:च्या ताटातील मुसळ दिसत नसेल हा भाग वेगळा! शिवाय ते साहजिक आहे. भाजपने पहिल्या यादीत ७१ विद्यमान आमदारांना वा मातब्बर राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीत कोणताही धोका न पत्करता प्रभावशाली राजकीय घराण्यांना झुकते माप दिले आहे. दूध पोळले की माणूस ताकही फुंकून पितो असे म्हणतात ते काही खोटे नाही. मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी १४ जागांचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.

पहिल्या यादीत पक्षाने १३ महिलांना तिकिटे दिली आहेत. या यादीत काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे, तर काही नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले. त्यानंतर आता त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी दिली आहे. (अशोकरावांना क्षणभर आपण काँग्रेसमध्येच आहोत असे वाटले असेल!) भाजपचे मुंबई अध्यक्ष व विद्यमान आमदार आशीष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून, नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना कणकवलीमधून, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांना दक्षिण कोल्हापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदनमधून तिकिट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील यांना निलंग्यामधून उमेदवारी मिळाली आहे. घाटकोपर पूर्व भाजपचा गड मानला जातो.

प्रकाश मेहता यांनी यापूर्वी भाजपचा गड राखला, मात्र भाजप नेते पराग शहा आणि प्रकाश मेहता यांच्यात वाद असल्याने यावेळी भाजपने पहिली यादी जाहीर करताना घाटकोपर पूर्वची उमेदवारी जाहीर न करता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. कल्याण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या गजाआड आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत कोणताही नवा चेहरा न घेता बव्हंशी विद्यमान आमदारांनाच तिकिट दिले आहे. या यादीत १३ महिला, ४ अनुसूचित जाती आणि ६ अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत. भाजपने अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, बाबासाहेब फुंडकर आणि बबन पाचपुते परिवारावर विशेष मेहरबानी दाखवली आहे. फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर (खामगाव) आणि बबन पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार यांना भेटून पक्ष सोडण्याची धमकी दिल्यानंतर गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघाचे तिकिट देण्यात आले आहे. मंदा म्हात्रे यांचे तिकिट कापण्यात आले आहे. मात्र, बेलापूर मतदारसंघात त्यांच्या मुलाला तिकिट देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे टेकचंद सावरकर यांचे तिकिट कापण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघात, कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे तर कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिली यादी जाहीर होताच पक्षात बंडाचे वारे वाहू लागले आहेत. नाराज नेते बंडाच्या तयारीत आहेत. घरोघरी मातीच्या चुली असतात. दुस-यावर घराणेशाहीचा आरोप करणारे सुद्धा एकाच माळेचे मणी आहेत हे विसरून कसे चालेल! ‘आपला तो बाब्या अन् दुस-याचं ते कार्टं’ असे म्हणतात ते यालाच!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR