23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रआमदारांचा आता हॉटेलमध्ये मुक्काम

आमदारांचा आता हॉटेलमध्ये मुक्काम

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हॉटेलवारीला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरेंचे सर्व आमदार निवडणुकीदरम्यान हॉटेलवर राहणार आहेत. १०,११ आणि १२ जुलै रोजी ठाकरेंचे १६ आमदार हॉटेलवर मुक्कामी असणार आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे आमदारही हॉटेलवर मुक्कामी जाणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहेत. १२ जुलै रोजी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद निवडणुकीसाठी २ उमेदवार तसेच पक्षासाठी स्वत:ची हक्काची ४३ मते आहेत. अजूनही राष्ट्रवादीला २ उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी ३ मतांची गरज आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीला उमेदवार निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित झाला आहे.

भाजपकडून खबरदारी
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपनेही सावध पावले उचलली आहेत. भाजपाच्या सर्व आमदाराना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे.

११ जागांसाठी १२ उमेदवार
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक लागली आहे. मात्र, १२ जुलै रोजी होणा-या ११ जागांच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी असू देत किंवा मग महायुती दोन्हीकडून मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे एक मोठे आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. त्यामुळे मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR