मुल्लानपूर : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आजच्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून थेट तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. तर पंजाब किंग्सची तिस-या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. गुणतालिकेत आता पाच संघाचे १० गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची होणार आहे.
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आज (रविवारी) आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पंजाब किंग्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमवून १५७ धावा केल्या आणि विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी फिलीप सॉल्ट आणि विराट कोहली मैदानात उतरले. पण पहिल्याच षटकात फिलीप सॉल्टच्या रुपाने धक्का बसला. पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. दुस-या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कल ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार मारले आणि ६१ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीने सावध पण सावरणारी खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. पण धावांचा पाठलाग करता असताना कर्णधार रजत पाटीदार १३ चेंडूत १२ धावा करून तंबूत परतला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पांड्या, सुयश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड यांनी चांगली गोलंदाजी केली. कृणाल पांड्याने ४ षटकात २५ धावा देत दोन गडी बाद केले. सुयश शर्माने ४ षटकात २६ धावा देत २ गडी बाद केले. तर रोमारियो शेफर्डने २ षटकं टाकली आणि १८ धावा देत १ गडी टिपला. पंजाब किंग्सकडून प्रभसिमर सिंगने ३३ आणि शशांक सिंगने नाबाद ३१ धावांची खेळी केली.