बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या तोंडावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. या लोकांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. या लोकांनी लघवी केली आहे ती संतोष देशमुखांच्या चेह-यावर नाही तर प्रशासनाच्या कारभारावर, असा आरोपही शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
या फोटोमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. करुणा शर्मा यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. करुणा शर्मा म्हणाल्या, आज महाराष्ट्राला न्याय मिळेल. काल मी एक फोटो बघितला. या फोटोत संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या तोंडावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. या लोकांची मानसिक स्थिती दिसत आहे. हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हीडीओ काढत आहेत. वाल्मिक कराड तो व्हीडीओ लाईव्ह बघत आहे. ते लोक खूप क्रूर आहेत. ते लोकांच्या समोर आले आहेत. आपला महाराष्ट्र कुठे गेला आहे?, असा सवालही करुणा शर्मा यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. आता ही त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली. अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, त्यांनी मुंडे यांना पाठीशी घातले आहे, असेही शर्मा म्हणाल्या.