नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीत अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू असल्याने आता इच्छुकांची चलबिचल सुरू झाली आहे. विशेषत: नाशिक शहरातील चारही मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातील हे स्पष्ट होत नसल्यामुळे इच्छुक टांगणीला लागले आहेत. यातच भाजपसह सर्व पक्षांतील इच्छुकांनी आता मुंबई, दिल्लीत लॉबिंग सुरू केले आहे.
दरम्यान, लोकसभा निकालानंतर मविआकडून इच्छुकांची संख्या अधिक असली, तरी हरियाणातील निकालामुळे महायुतीच्या इच्छुकांच्या आशेलाही धुमारे फुटले आहेत. त्यात भाजपकडून भाकरी फिरवली जाण्याची चर्चा सुरू आहे. भाजपसह सर्व पक्षांतील इच्छुकांनी आता मुंबई, दिल्लीत लॉबिंग सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही ठिकाणी महायुतीचा दारुण पराभव झाला होता. लोकसभेच्या या जागा अनुक्रमे ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने जिंकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
जिल्ह्यात लोकसभेनंतर महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’आल्यामुळे इच्छुकांचा सर्वाधिक ओढा महाविकास आघाडीकडे दिसून येत आहे. काँग्रेसकडे जवळपास ६४ जणांनी मुलाखती दिल्या आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सर्वाधिक ७२ जणांनी मुलाखती दिल्या. पाठोपाठ शिवसेना (उबाठा) पक्षाकडेही ५० पेक्षा अधिक जणांनी लॉबिंग सुरू केले आहे.
प्रचाराला अवघा महिना शिल्लक
महायुतीतही अशीच परिस्थिती आहे. प्रचाराला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याने, इच्छुकांनी नेत्यांसह पक्षावर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक लढण्याची तयारी असली तरी जागा कोणाला सुटेल याची शाश्वती मविआ, महायुतीत नाही. त्यामुळे जागा आणि शब्द सोडवून घेण्यासाठी इच्छुकांनी आता मुंबई, दिल्लीवा-या सुरू केल्याचे चित्र आहे.